माझा गणपती
गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२
बुधवार, २४ ऑगस्ट, २०११
बाप्पा
बाप्पा
तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस ,
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक,
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक,
इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो ,
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो ,
काय करू आता सार मॅनेज होत नाही ,
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत,
इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सीस्टीम झालीये हॅंग ,
तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग ,
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात,
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात,
माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन,
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन ,
एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?
असं कर बाप्पा, एक लॅपटॉप घेउन टाक,
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक,
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको,
परत येउन मला दमलो म्हणायला नको,
माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश,
माग म्हणाला हवं ते, एक वर देतो बक्षिस,
सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप,
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप.
मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं .
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं.
'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं ',
'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं',
'हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव',
'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव ',
'देशील आणून परत माझी हरवलेली नाती ',
'नेशील मला परत जिथे आहे माझी माती ',
'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं ',
'आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं ',
'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर ',
'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार ',
'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान',
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?
"तथास्तु" म्हणाला नाही, सोंडेमागून नुसता हसला .
सारं हाताबाहेर गेलंय
मराठी संस्कृती आणि गणपती
मराठी संस्कृती आणि गणपती
मराठी संस्कृतीत गणपतीचा उल्लेख अनेक ठिकाणी दिसतो.
महाराष्ट्रातील घरे व मंदिरांच्या मुख्य दारावर गणेशपट्टी वा गणेशप्रतिमा असते. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणा-या संकंटांचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते.
मराठी साहित्याच्या प्रारंभ काळापासून गणेशाचे उल्लेख आहेत. मराठी भाषेमधील आद्य वाङमयकार असलेल्या महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथात गणपतीचा असा उल्लेख येतो -
“ तेया गणरायाचे उदार रूपडे थोरपण जिंकले होडे ।
कवीस शब्दब्रह्मीची राणिव कोडे, जेणे पाहिले तो सिंदुरे आंडंबरे ।।
गोर मेरू जसा, तयाचे ठायी सिद्धीचे सर्ग, नानाविध वसती भोग ।
तेण आधारे अग्नेय सुखावले।।
ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील खालील नमनाची ओवी सुप्रसिद्ध आहे -
ओम नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जयजय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||
देवा तुचि गणेशु| सकलमतिप्रकाशु| म्हणे निवृत्तीदासु | अवधारिजोजी ||
नामदेवांनीही गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. त्यात ते म्हणतात -
लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड करितसे खंड दुश्चिन्हांचा ||
चतुर्थ आयुधे शोभतासी हाती भक्ताला रक्षिती निरंतर ||
तुकोबा गणपतीला नाचत येण्याची विनंती करतात -
गणराया लौकरी येई । भेटी सकलांसी देई ।।
अंगी सिंदूराची उटी । केशरकस्तुरी लल्लाटी ।।
पायी घाग-या वाजती । नाचत आला गणपती ।।
तुका म्हणे पाही । विठ्ठल गणपती दुजा नाही ।।
गणपती संतवाङमय व शास्त्रपुराणांबाहेर पडून लोकसंस्कृतीतही अनेक ठिकाणी आला आहे. तमाशातला प्रारंभीचा गण गणेशस्तवनाचा असतो. यात गणपती ऋद्धीसिद्धींसह नाचत येतो.
पठ्ठे बापूराव आपल्या कवनात म्हणतात - तुम्ही गौरीच्या नंदना । विघ्न कंदना । या नाचत रमणी । जी जी जी ||
कोकणातील गणपतीच्या नाचाची गाणी प्रसिद्ध आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बाल्यांचा गणपतीचा नाच दमदार व लक्षवेधी असतो. बाल्यांचे गणपतीचे एक गाणे असे - यावे नाचत गौरीबाळा । हाती घेऊनी पुष्पांच्या माळा । सर्वे ठायी वंदितो तुला | यावे नाचत गौरीबाळा।
लोकगीतामध्येही गणपतीचे वर्णन येते. कार्तिकेय गणपती भावांचा झगडा, शंकरपार्वतीचे बालकौतुक असे अनेक विषय यात आहेत. एका लोकगीतातले वर्णन असे -
“ हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।
आमी जातो आमी जातो, सोनारू साळा ।।
सोनारीन बाई ग सोनारू दादा ।।
बाळाचं पैजण झालंका न्हाई ?
फिरून येजा फिरून येजा गवराबाई गवराबाई ।।
हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।
”
गवराबाईने म्हणजे गणपतीच्या आईने (गौरीने) गणेशबाळासाठी सोनाराकडे पैजण करायला टाकले आहेत आणि सोनाराने ते अजून दिले नाहीत असे वर्णन या गाण्यात आहे.
असे मराठी संस्कृतीत ठायीठायी असणा-या गणपतीचा उत्सव सार्वजनिक करून लोकमान्य टिळकांनी गणेशाचे महाराष्ट्राच्या लोकजीवनातील महत्व अधोरेखित केले.
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्
बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्
लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदंविघ्नेश्वरं ओझरम्
ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात् सदा मंगलम्
जय गणपती गुणपती गजवदना
आज तुझी पूजा देवा गौरीनंदना
कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन
काळजात सिंहासन मधोमधी गजानन
दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना
अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
गणपती, पहिला गणपती
मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
अकरा पायरी हो अकरा पायरी हो
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर
शोभा साजरी हो शोभा साजरी हो
मोऱ्या गोसाव्यानं घेतला वसा
गणपती, दुसरा गणपती
थेऊर गावचा चिंतामणी
कहाणी त्याची लई लई जुनी
काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं साऱ्यांनी
विस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यानी
रमा बाईला अमर केलं वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली चिंतामणी
भगताच्या मनी त्याचा अजूनी ठसा
गणपती, तिसरा गणपती
सिद्धिविनायका तुझं सिद्धटेक गाव रं
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं
दैत्यामारु कैकवार गांजलं हे नगर
विष्णुनारायण गाई गणपतीचा मंतर
टापूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखर
चंद्र सूर्य गरुडाची भोवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा
गणपती, चौथा गणपती
पायी रांजणगावचा देव महागणपती
दहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणती
गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन
सूर्य फेकी मूर्तीभर वेळ साधून किरण
किती गुणगान गावं किती करावी गणती
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा
गणपती, पाचवा गणपती
ओझरचा इघ्नेश्वर लांब रुंद होई मूर्ती
जड जवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती
डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा
तहानभूक हरपती हो सारा बघून सोहळा
चारी बाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा
गणपती, सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी
गणाची स्वारी तयार गिरिजात्मक हे नाव
दगडामंदी कोरलाय् भक्तिभाव
रमती इथे रंका संगती राव
शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो
लेण्याद्री गणानी पाठी आशिर्वाद केला हो
पुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो
किरपेने गणाच्या शिवबा धाऊनी आला हो
खडकात केले खोदकाम दगडात मंडपी खांब
वाघ सिंह हत्ती लई मोठं दगडात भव्य मुखवट
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
आणि गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
दगडमाती रुपदेवाचं लेण्याद्री जसा
सातवा गणपती राया
महड गावाची महसूर वरदविनायकाचं तिथं एक मंदिर
मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर
सपनात भक्ताला कळं देवळाच्या मागं आहे तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यानी बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा
आठवा आठवा गणपती आठवा
पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धीसागरा
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख सूर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे
चिरेबंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा
मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - अनिल-अरुण
स्वर - अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर,
चंद्रशेखर गाडगीळ, मल्लेश
चित्रपट - अष्टविनायक (१९७९)
टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती
टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती
टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती, दुष्यंत, मंदिर, विवाह गणपती, शकुंतला |
टिटवाळयाचा सिद्धिविनायक महागणपती
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात टिटवाळा नावाचे एक छोटे शहर वजा एक खेडे आहे. एक प्राचीन आणि पुरातन असे सिद्धिविनायक महागणपतीचे मंदिर आहे. ह्या गणपतीला विवाह गणपती असेही म्हणतात. १२ ते १३ एकर वर पसरलेले हे मंदिर कालू नदीच्या तीरावरच वसलेले आहे. ह्या मंदिराचा उल्लेख हजारो वर्षापूर्वीच्या ग्रंथात आणि साहित्यातही सापडतो. मधल्या काळात ह्या स्थळाचे वर्णन कुठेच आढळत नाही थेट माधवराव पेशवांच्या काळात ह्या मंदिराचा उल्लेख येतो.
प्राचीन साहित्यांच्या आधारे हे शहर त्यावेळेला दंडकारण्यात येत होते. (दंडकारण्याचा परिसर काही साहित्याप्रमाणे आत्ताचा पूर्ण (?) महाराष्ट्र (कदाचित कोंकण सोडून) आणि मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, आत्ताचे छत्तीसगड, बिहार ह्या राज्याचा काही भाग. आता बहुतांशी भाग हा नक्षलवादींच्या हाताखाली आहे.) कण्व ऋषी ह्या परिसरात आश्रम बांधून राहत होते. कण्व ऋषीं ऋग्वेद आणि अंगिरस ह्या वेदांचे लेखक मानले जातात. ह्या ऋषींनी शकुंतला नामक मुलीला तिच्या आई वडिलांनी त्याग केल्यावर दत्तक घेतली होती. शकुंतला हि ज्येष्ट ऋषी विश्वामित्र आणि अप्सरा मेनका ह्यांच्या संबधातून जन्माला आलेली होती. तिच्या जन्मानंतर तिच्या आई वडिलांनी तिच्या त्याग केल्यावर कण्व ऋषींनी तिला दत्तक घेऊन तिचा सांभाळ केला.
दुष्यंत शकुंतला राजा रवी वर्म्याच्या नजरेतून
एकदा गांधार देशाचा राजा दुष्यंत लढाईच्या मार्गावर असताना ह्या परिसराच्या बाजूने जात होता. त्यावेळेला त्याने सुंदर शकुंतलेला पहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला. तीच गोष्ट शकुंतलेच्या बाबतीत ही घडली. पुढे त्या दोघानी गंधर्व पद्धतीने विवाह केला. काही काळ एकत्र व्यतीत केल्यावर राजा दुष्यंताला आपल्या राज्यात परतावे लागले. जाताना त्याने आठवण म्हणून आपली राजेशाही खानदानी अंगठी तिला दिली आणि त्याने परत येऊन तिला घेऊन जाण्याचे वचन देऊन तो निघून गेला. काही काळाने एकदा आश्रमात दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी अत्यंत तापट स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते. शकुंतला दुष्यंताच्या विचारात मग्न असल्यामुळे तिने त्यांचे यथायोग्य स्वागत केले नाही म्हणून त्यांनी रागाने तिला शाप दिला कि तू ज्या आवडत्या व्यक्तीच्या विचारात राहून माझे स्वागत केले नाहीस तोच व्यक्ती तुला तुझ्या आठवणींसकट विसरून जाईल. शकुंतलेने माफी मागितल्यावर त्यांनी दया येऊन तिला उ:शाप हि दिला कि त्याने दिलेले प्रेमाचे प्रतिक त्याला दाखवल्यावर त्याला सर्व आठवेल.
दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापानुसार सर्व घडत गेले. राजा दुष्यंताने शकुंतलेला ओळखले नाही व तिचा स्वीकार हि केला नाही. कण्व ऋषींनी शकुंतलेची दशा पाहून तिला विघ्नहर्त्या सिद्धिविनायक गणेशाची स्थापना करून पूजा करायला सांगितली. सिद्धिविनायकची भक्ती केल्यानंतर तिच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि राजा दुष्यंत तिचा स्वीकार करेल. कण्व ऋषींनी सांगितल्याप्रमाणे तिने सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले आणि गणेशाची भक्ती केली. नंतर काळानुसार दुष्यंताने तिचा स्वीकार केला. दुष्यान्तापासून तिला मुलगा हि झाला. त्याचे नाव भारत ठेवले गेले. महाभारतातील कौरव पांडव हे ह्या भारत राजाचेच वंशज होते.
पुढे काळाच्या ओघात ते मंदिर पाण्याखाली गेले असावे. कारण मधल्या कुठल्याच काळात त्याचे अस्तित्व सापडत नाही. पेशवांच्या काळात एकदा दुष्काळ पडला असताना त्या दुष्काळावर मात करण्यासाठी पेशव्याचे सरदार रामचंद्र मेहेंदळे ह्यांनी तलावाचे उत्खनन करायला चालू केले असता त्यांना मंदिराचे अवशेष सापडले. पुढे स्वप्नातील दृष्टांतानुसार त्यांना पुढे गणेशाची मूर्ती सापडली. पेशव्यांनी लगेचच मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. पुढे वसईची स्वारी जिंकून आल्यानंतर त्यांनी गणेशाच्या मूर्तीची प्रतिस्थापना केली.१९६५-६६ सालापर्यंत पेशव्यांनी बांधलेल्या मंदिराची पडझड झाली होती. लाकडाचे बांधकाम असलेल्या सभामंड हि छोटा पडू लागला होता. म्हणून १९६५-६६ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला
पेशव्यांनी ३ एकर जागा देऊन हे मंदिर बांधले होते. नंतर मंदिराचे पारंपारिक पुजारी जोशी ह्यांनी आपल्याकडची १३ एकर जागा देऊन ह्या मंदिराचा विस्तार केला. नुकतेच महापालिकेने तलावाचे बांधकाम करून सारा परिसर सुशोभित केला.
ह्या गणेशाला विवाह गणपती सुद्धा म्हणतात.विवाह न होणाऱ्यांसाठी आणि विवाह इच्छुक जोडप्यांनी ह्या गणेशाची आराधना केल्यावर त्यांच्या मनासारखा विवाह घडून येतो. तसेच घटस्फोटीत जोडपे हि आपले वाद मिटवण्यासाठी ह्या गणपतीचे दर्शन घेतात. गणपतीची मूर्ती हि हि ३.५ ते ४ फुट उंचीचा ओटा बांधून त्यावर विराजमान झालेली आहे. त्यामुळे सभा मंडपात बसून हि देवाचे चांगले दर्शन होते. सभामंडपाच्या वर असलेल्या गॅलेरी मधून सभामंडपाचे आणि गणेशाच्या मूर्तीचे दर्शन होते.
सुरक्षेच्या कारणास्तव आता ह्या मूर्तीचे फोटो काढता येत नाही. वर लावलेला मूर्तीचा फोटो हा नेट वरून घेतलेला आहे. ह्या मंदिरात जायला मध्य रेल्वेवरच्या टिटवाळा स्टेशन वर उतरावे लागते. तेथून टांग्याने किंवा ऑटो करून ५ मिनिटात मंदिरात जाता येते. सकाळी लवकर गेल्यास ऑटो न करता आजूबाजूचा निसर्ग पाहत रमत गमत चालत जायचे. चालत २५ ते ३० मिनिटात मंदिरात पोहोचता येते. मंदिरात दर्शन करून अर्धा तास बसायचे आणि मग आरामात परतीला लागायचे.
सोमवार, ८ ऑगस्ट, २०११
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)