टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती
टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती, दुष्यंत, मंदिर, विवाह गणपती, शकुंतला |
टिटवाळयाचा सिद्धिविनायक महागणपती
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात टिटवाळा नावाचे एक छोटे शहर वजा एक खेडे आहे. एक प्राचीन आणि पुरातन असे सिद्धिविनायक महागणपतीचे मंदिर आहे. ह्या गणपतीला विवाह गणपती असेही म्हणतात. १२ ते १३ एकर वर पसरलेले हे मंदिर कालू नदीच्या तीरावरच वसलेले आहे. ह्या मंदिराचा उल्लेख हजारो वर्षापूर्वीच्या ग्रंथात आणि साहित्यातही सापडतो. मधल्या काळात ह्या स्थळाचे वर्णन कुठेच आढळत नाही थेट माधवराव पेशवांच्या काळात ह्या मंदिराचा उल्लेख येतो.
प्राचीन साहित्यांच्या आधारे हे शहर त्यावेळेला दंडकारण्यात येत होते. (दंडकारण्याचा परिसर काही साहित्याप्रमाणे आत्ताचा पूर्ण (?) महाराष्ट्र (कदाचित कोंकण सोडून) आणि मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, आत्ताचे छत्तीसगड, बिहार ह्या राज्याचा काही भाग. आता बहुतांशी भाग हा नक्षलवादींच्या हाताखाली आहे.) कण्व ऋषी ह्या परिसरात आश्रम बांधून राहत होते. कण्व ऋषीं ऋग्वेद आणि अंगिरस ह्या वेदांचे लेखक मानले जातात. ह्या ऋषींनी शकुंतला नामक मुलीला तिच्या आई वडिलांनी त्याग केल्यावर दत्तक घेतली होती. शकुंतला हि ज्येष्ट ऋषी विश्वामित्र आणि अप्सरा मेनका ह्यांच्या संबधातून जन्माला आलेली होती. तिच्या जन्मानंतर तिच्या आई वडिलांनी तिच्या त्याग केल्यावर कण्व ऋषींनी तिला दत्तक घेऊन तिचा सांभाळ केला.
दुष्यंत शकुंतला राजा रवी वर्म्याच्या नजरेतून
एकदा गांधार देशाचा राजा दुष्यंत लढाईच्या मार्गावर असताना ह्या परिसराच्या बाजूने जात होता. त्यावेळेला त्याने सुंदर शकुंतलेला पहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला. तीच गोष्ट शकुंतलेच्या बाबतीत ही घडली. पुढे त्या दोघानी गंधर्व पद्धतीने विवाह केला. काही काळ एकत्र व्यतीत केल्यावर राजा दुष्यंताला आपल्या राज्यात परतावे लागले. जाताना त्याने आठवण म्हणून आपली राजेशाही खानदानी अंगठी तिला दिली आणि त्याने परत येऊन तिला घेऊन जाण्याचे वचन देऊन तो निघून गेला. काही काळाने एकदा आश्रमात दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी अत्यंत तापट स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते. शकुंतला दुष्यंताच्या विचारात मग्न असल्यामुळे तिने त्यांचे यथायोग्य स्वागत केले नाही म्हणून त्यांनी रागाने तिला शाप दिला कि तू ज्या आवडत्या व्यक्तीच्या विचारात राहून माझे स्वागत केले नाहीस तोच व्यक्ती तुला तुझ्या आठवणींसकट विसरून जाईल. शकुंतलेने माफी मागितल्यावर त्यांनी दया येऊन तिला उ:शाप हि दिला कि त्याने दिलेले प्रेमाचे प्रतिक त्याला दाखवल्यावर त्याला सर्व आठवेल.
दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापानुसार सर्व घडत गेले. राजा दुष्यंताने शकुंतलेला ओळखले नाही व तिचा स्वीकार हि केला नाही. कण्व ऋषींनी शकुंतलेची दशा पाहून तिला विघ्नहर्त्या सिद्धिविनायक गणेशाची स्थापना करून पूजा करायला सांगितली. सिद्धिविनायकची भक्ती केल्यानंतर तिच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि राजा दुष्यंत तिचा स्वीकार करेल. कण्व ऋषींनी सांगितल्याप्रमाणे तिने सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले आणि गणेशाची भक्ती केली. नंतर काळानुसार दुष्यंताने तिचा स्वीकार केला. दुष्यान्तापासून तिला मुलगा हि झाला. त्याचे नाव भारत ठेवले गेले. महाभारतातील कौरव पांडव हे ह्या भारत राजाचेच वंशज होते.
पुढे काळाच्या ओघात ते मंदिर पाण्याखाली गेले असावे. कारण मधल्या कुठल्याच काळात त्याचे अस्तित्व सापडत नाही. पेशवांच्या काळात एकदा दुष्काळ पडला असताना त्या दुष्काळावर मात करण्यासाठी पेशव्याचे सरदार रामचंद्र मेहेंदळे ह्यांनी तलावाचे उत्खनन करायला चालू केले असता त्यांना मंदिराचे अवशेष सापडले. पुढे स्वप्नातील दृष्टांतानुसार त्यांना पुढे गणेशाची मूर्ती सापडली. पेशव्यांनी लगेचच मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. पुढे वसईची स्वारी जिंकून आल्यानंतर त्यांनी गणेशाच्या मूर्तीची प्रतिस्थापना केली.१९६५-६६ सालापर्यंत पेशव्यांनी बांधलेल्या मंदिराची पडझड झाली होती. लाकडाचे बांधकाम असलेल्या सभामंड हि छोटा पडू लागला होता. म्हणून १९६५-६६ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला
पेशव्यांनी ३ एकर जागा देऊन हे मंदिर बांधले होते. नंतर मंदिराचे पारंपारिक पुजारी जोशी ह्यांनी आपल्याकडची १३ एकर जागा देऊन ह्या मंदिराचा विस्तार केला. नुकतेच महापालिकेने तलावाचे बांधकाम करून सारा परिसर सुशोभित केला.
ह्या गणेशाला विवाह गणपती सुद्धा म्हणतात.विवाह न होणाऱ्यांसाठी आणि विवाह इच्छुक जोडप्यांनी ह्या गणेशाची आराधना केल्यावर त्यांच्या मनासारखा विवाह घडून येतो. तसेच घटस्फोटीत जोडपे हि आपले वाद मिटवण्यासाठी ह्या गणपतीचे दर्शन घेतात. गणपतीची मूर्ती हि हि ३.५ ते ४ फुट उंचीचा ओटा बांधून त्यावर विराजमान झालेली आहे. त्यामुळे सभा मंडपात बसून हि देवाचे चांगले दर्शन होते. सभामंडपाच्या वर असलेल्या गॅलेरी मधून सभामंडपाचे आणि गणेशाच्या मूर्तीचे दर्शन होते.
सुरक्षेच्या कारणास्तव आता ह्या मूर्तीचे फोटो काढता येत नाही. वर लावलेला मूर्तीचा फोटो हा नेट वरून घेतलेला आहे. ह्या मंदिरात जायला मध्य रेल्वेवरच्या टिटवाळा स्टेशन वर उतरावे लागते. तेथून टांग्याने किंवा ऑटो करून ५ मिनिटात मंदिरात जाता येते. सकाळी लवकर गेल्यास ऑटो न करता आजूबाजूचा निसर्ग पाहत रमत गमत चालत जायचे. चालत २५ ते ३० मिनिटात मंदिरात पोहोचता येते. मंदिरात दर्शन करून अर्धा तास बसायचे आणि मग आरामात परतीला लागायचे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा